व्यापाऱ्याला अश्लिल शिवीगाळ करून पैसे व मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील आठवडे बाजारात नियमानुसार वाहनातून बैल विक्रीसाठी आलेल्या तरुण व्यापाऱ्याला चार जणांनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहनाचा रस्ता अडवून अश्लिल शिवीगाळ करून जबरदस्तीने पैसे मागून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तुलसीदास रवींद्र पाटील वय-२४, रा.नागलवाडी ता.चोपडा हे शेतकरी असून बैल खरेदी विक्रीचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान दर गुरुवारी धरणगाव शहरात आठवडे बाजार भरतो. या अनुषंगाने तुलसीदास पाटील हे गुरुवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नागलवाडी येथून धरणगावला बाजारात येण्यासाठी वाहनात बैल घेऊन आले होते. त्यावेळी रेल्वे उड्डाणपुलावर संशयित आरोपी गणेश राजेंद्र धनगर, बंटी रमेश महाजन, शिवम ईश्वर पारधी आणि हर्षल शशिकांत पाटील यांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर तरूणाला “गाडी ही एरंडोल रोडने पुढे घे नाहीतर पैसे दे” असे बोलले. तुलशीदास यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी पुलावरच गाडीतून बैल उतरण्यास सांगितले आणि त्यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न करत गाडीची चावी काढून घेतली. त्यावेळी तुलसीदास यांनी बैल विकत घेतल्याची नियमानुसार पावती दाखवून सुद्धा त्यांनी ऐकून घेतली नाही. त्यामुळे तुलसीदास पाटील यांनी थेट वाहन धरणगाव पोलीस ठाण्यात नेले. त्यानुसार तुळशीदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राजेंद्र धनगर, बंटी रमेश महाजन, शुभम ईश्वर पारधी आणि हर्षल शशिकांत पाटील या चौघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content