भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याची टाकी स्वच्छ करून दोन दिवस कोरडा दिवस पाळला , परंतु, अज्ञात व्यक्तीने टाकीच्या आउटलेट पाईपमध्ये सिमेंट रेती मिश्रित गोळा फसवून ठेवल्याने गावात तब्बल चार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या प्रकाराचा समस्त ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला आहे. तर घाणेरडे राजकारण करू नका असे आवाहन प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी केले आहे.
गावातील विरोधी पक्षाच्या लोकांनी गावात दूषित पाणीपुरवठा होत असून गावात पाण्यामुळे कोरोना होऊन सत्तर-ऐंशी लोक मृत झाल्याची खोटी तक्रार गटविकास अधिकारी, कलेक्टर, मुख्याधिकारी व मंत्री यांच्याकडे केलेली होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील पाण्याची टाकी स्वच्छ धुऊन दोन दिवस कोरडा दिवस पाळण्याचे निश्चित केले. दोन दिवस पाण्याची टाकी पूर्णपणे कोरडी होती. याचाच फायदा कुणीतरी व्यक्तीने घेऊन पाण्याच्या टाकीच्या आत असलेला आउटलेट पाइपमध्ये सिमेंट रेती व भत्ता मिश्रित गोळा फसवून ठेवला. दोन दिवसानंतर पाण्याची टाकी भरली गेली, मात्र एकही थेंब पाणी टाकीच्या खाली येत नव्हते. यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन हादरले. त्यांनी दोन मोटर, एक जाफडा लावून पाण्याची टाकी खाली करण्यात आली. त्यानंतर टोकराच्या साह्याने पाईपच्या आतमध्ये ठोकून तो गोळा खाली घसरविण्यात आला. पाण्याच्या टाकी खाली एलबोच्या जागी पाईप खोलून लोखंडी सळईच्या साह्याने गोळा तोडण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या टाकीतील आउटलेट सुरळीत झाले व सर्व ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कर्मचारी वर्गाने सरपंच कमिटीने सुटकेचा श्वास सोडला.
टाकीच्या खाली असलेल्या पाईप लाईनची जोडणी सुरू असून रविवार उद्या दि २३ मे रोजी संध्याकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी ग्वाही सरपंच आनंद ठाकरे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खंडित काळात ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत प्रशासनाने आभार व्यक्त केलेल आहे. गेले दोन दिवस ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्व कर्मचारी तसेच प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, विष्णू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कोळी गजानन पवार,कुंदन कोळी, सागर सोनवाल, स्वप्निल सपकाळे, पप्पू राजपूत, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी अशोक कोळी, गोपाळ पाटील, अनिल सोनवाल, पंकज पाटील, प्रदीप कोळी, पंकज ठाकूर, सुनील चौधरी व समस्त कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
प्रभारी सरपंच आनंद ठाकरे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट जलसेवा देणारे साकेगाव ग्रामपंचायत असून आरो प्लांट, मोफत शुद्ध पाणी तसेच चौकाचौकात २४ तास जलसेवा केंद्र, दोन जलकुंभ एमआयडीसी सोर्स ग्रामपंचायत प्रशासनाचे विहीर व ट्यूबवेल असा एकंदरीत उत्कृष्ट पाणीपुरवठा होत आहे. गावात कुणीतरी पाण्यात घाणेरडे राजकारण करीत आहे पाणी हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून आधीच उन्हाळा आहे त्यामुळे विरोधकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुरळीत पाणीपुरवठ्यात खोडा घालण्याचे काम करू नये अशी आग्रहाची विनंती असे म्हटले आहे.