अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नकार्य म्हटलं की सगेसोयरे, मित्रमंडळी व हितचिंतकाना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी विविध आकर्षक, सुंदर व महागड्या पत्रिका छापल्या जातात. मात्र पातोंडा येथील पत्रकार सागर मोरे यांनी आगळीवेगळी कल्पना मांडत शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘पाणी बचती’चा पर्यावरण पूरक संदेश विवाहाच्या आमंत्रण पत्रिकेत दिला आहे.
जल, जंगल, जमीन वाचविणे ही काळाजी गरज असून ते लक्षात घेऊन शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने शहरी व ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरे व खेडे ही पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीच्या ओघात सहभागी होत असून जल,जंगल,जमिन वाचविण्याच्या सर्व बाबी व घटकांवर काम केले जात आहे.
अमीर खानच्या ‘पाणी फौंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पाणी वाचविण्यासाठी मोठी चळवळ व मोहीम उभी राहिली आहे. या चळवळीत पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सागर मोरे काम करत असून त्यासोबतच पातोंडा ग्राम पंचायतीने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविला आहे.
शासनाचा हा उपक्रम व पाणी फौंडेशनची पाण्याची चळवळ ही समाजाच्या प्रत्येक घटकांत पोहोचायला म्हणून त्यांनी त्यांच्या गुरुवार, दि.२८ एप्रिल रोजी संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत कोणत्याही प्रकारची माझी वसुंधरा अभियानाचा लोगो व पाणी बचतीचा संदेश छापून त्यासोबत वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे व पाण्याचे संरक्षण; धरतीचे रक्षण असे संदेश असलेली पत्रिका बनवली आहे.
घराघरात, समाजात ही पत्रिका पोहोचून पर्यावरणाचा प्रसार ते या माध्यमातून करत आहे. त्यांच्या या छोट्याशा स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.