दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा मंत्र दिला. सध्या वातावरण काँग्रेसच्या बाजूने आहे, पण ही गती कायम राखणे आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाने जी विश्वासार्हता निर्माण केली आहे, ती टिकवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच आपल्याला अतिआत्मविश्वास असण्याची गरज नाही. जर आपण चांगली कामगिरी केली तर लोकसभा निवडणुकीतील वातावरणाच्या आधारे राष्ट्रीय राजकारण बदलेल, असेही त्या म्हणाल्या.
आगामी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या तर त्याचा राष्ट्रीय राजकारणावर विशेष परिणाम होईल, त्यामुळे तयारीला लागा. वारा आपल्या बाजूने आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतक-यांच्या आणि विशेषत: तरुणांच्या ज्वलंत मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या. आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या की, जातीय जनगणना करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. यामुळे देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची खरी माहिती देशासमोर येणार नाही. याचा अर्थ असाही होतो की आमचे किमान १२ कोटी नागरिक २०१३ च्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत, ज्याचे आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना असे नामकरण करण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून मोदी सरकार धडा घेईल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, तसे झाले नाही आणि सरकारने देशातील समुदायांमध्ये फूट पाडण्याचे आणि भीतीचे-शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करण्याचे धोरण चालू ठेवले आहे, असा गंभीर आरोपही सोनिया गांधींनी केला. सुदैवाने सुप्रीम कोर्टाने योग्य वेळी हस्तक्षेप केला, पण यामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकेल. नोकरशाहीला आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अचानक नियम कसे बदलले गेले? आरएसएस स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवते पण ती भाजपचा राजकीय आणि वैचारिक आधार आहे हे सा-या जगाला माहीत आहे, असा हल्लाबोल सोनिया गांधींनी मोदी सरकारवर केला.