नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आतिशी यांची एकमताने निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासह पाच आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपराज्यपालांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. १५ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार हे जाहीर केलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली होती. पुढच्या दोन दिवसातच आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता आतिशी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.