दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पदभार स्वीकारला आहे. मात्र, यावेळी आतिशी या केजरीवाल यांच्यासाठी रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसल्या. मुख्यमंत्री कार्यालयात अरविंद केजरीवाल यांच्या खुर्ची शेजारी दुसरी खुर्ची ठेवून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दिल्लीतील लोक जोपर्यंत त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवत नाहीत तोपर्यंत ती अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे त्यांनी पदभार देतांना स्पष्ट केले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला आहे. पुढील चार महिन्यासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. असे असले तरी आतिशी या रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्या प्रमाणे भरताने प्रभू रामाचे जोडे राज सिंहासनावर ठेवत १४ वर्षे राज्य कारभार सांभाळला, त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचा कारभार सांभाळणार असल्याचं आतिशी यांनी पदभार स्वीकारतांना म्हटलं.
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आतिशी म्हणाले, मी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रभू रामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि भरताला राज्य ताब्यात घ्यावं लागलं. तेव्हा भरत यांना ज्या वेदना झाल्या त्या वेदना मी आज भोगत आहे. ज्याप्रमाणे भरताने सिंहासनावर प्रभू रामाचे जोडे ठेवले आणि १४ वर्षे राज्य कारभार केला त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचे सरकार चालवणार आहे.
आतिशी पुढे म्हणाल्या, अरविंद केजरीवाल यांनी शिष्टाचार आणि नैतिकतेचा आदर्श ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपने अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आणि सहा महिने तुरुंगातही टाकण्यात आले. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अरविंद केजरीवाल यांच्याकडे आहे. मला आशा आहे की दिल्लीचे लोक त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून देतील. तोपर्यंत या कार्यालयात खुर्ची राहणार असून आम्ही अरविंद केजरीवालांच्या परतण्याची वाट पाहणार आहोत.