जळगाव (प्रतिनिधी)। येथील एसएमआयटी कॉलेजजवळील नाल्यावरील काढण्यासाठी आज सकाळी महापालिकेचे पथक जेसीबीसह आले होते. परंतू यावेळी नागरिकांनी पावसाळयाच्या तोंडावर अतिक्रमण काढण्यास विरोध केला. तर मनपा अतिक्रमण विभाग मात्र, अतिक्रमण काढण्यावर ठाम होता. यावरून काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, महापौर सीमाताई भोळे यांनी घटनास्थळी भेट देत आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढते, असे आश्वासन देत आयुक्तांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांचे पुढील आदेश येई, पर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबविण्यात आली असून पथक तेथेच थांबून आहे.
महापालिकेचे पथक अतिक्रमण काढण्यास येताच काही नागरिकांनी मोजमाप करण्यात आली नसल्याचे सांगितले. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये अतिक्रमण विभागाचे अधीक्षक खान, बांधकाम विभागाचे विभाग प्रमुख सुनील भोळे, नगररचना विभागातील प्रकाश पाटील, समीर बोरवले आदी उपस्थित होते. महिलांनी यावेळी पावसाळा दोन दिवसांवर आले असताना अतिक्रमणाची कारवाई करू नये ,अशी विनंती केली.
यावेळी महापौर सीमा भोळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. यावेळी महिलांनी त्यांच्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. पावसाळा सुरू होत असल्याने हे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली. तसेच नोटीस न देता अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. तर बांधकाम विभागाचे सुनील भोळे यांनी आताच कारवाई होईल अशी भूमिका घेतली. तेव्हा नागरिकांनी त्याला विरोध केला. कारण महापालिका गटारीचे काम लवकर पूर्ण करणार नाही, असे म्हणत शंका व्यक्त केली. या चौकातील दिवसाचे काम संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहिल्यास पावसाळ्यात त्रास होईल. असे त्यांनी सांगितले. यावर महापौर सीमा भोळे यांनी आपण आयुक्तांशी या संदर्भात चर्चा ककरते असे आश्वासन देऊन त्या तेथून निघून गेल्या. दुसरीकडे अतिक्रमण विभागाने तयारी करून जेसीबीसह कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. महापौर चर्चा करणार असल्याने तोपर्यंत काम थांबविण्यात आले आहे. एकीकडे भाजप विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे सांगत असताना शहरातील विकासकामांबाबत स्पष्ट भूमिका घेताना महापौर यावेळी दिसल्या नाहीत.