जळगाव, प्रतिनिधी | हाणामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासह वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या पंटरासह हवलदाराला एसीबी पथकाने लाच घेतांना आज रंगेहात पकडले आहे. हवलदार शालिकराम व्यंकटराम कुंभार( रा. टाकळी प्रचा,खरजाई नाका) व पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख (रा. चाळीसगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
ताक्रदारावर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे भाग-५ गुरनं- १६४ / २०१९, भादवि कलम-३२४,३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल असुन त्यास सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी व भादवि कलम- ३५४ हे वाढीव कलम न लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पोहेकॉ शालिकराम व्यंकटराम कुंभार रा. टाकळी प्रचा, खरजाई नाका, चाळीसगाव याने त्यांच्या पंटरामार्फत लाचेची मागणी शनिवार २१ सप्टेंबर रोजी केली होती. आज सोमवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख (वय-३९ ) रा.चाळीसगाव यास लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत विभागाच्या जळगाव शाखेचे पोलीस उप अधिक्षक सुनील कडासने, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोकॉ.प्रशांत ठाकुर, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.