चोपडा, प्रतिनधी | पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या जागृती अभियानाअंतर्गत येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चोपडा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनिल गावित व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ. भावना भोसले, तालुका समन्वयक तथा नोडल अधिकारी युवराज पाटील यांनी यावेळी भेट देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी कलाशिक्षक व्हीं. डी. पाटील यांनी परिश्रम घेतले. उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक केले. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मतदार जागृतीचा संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या यावेळी विद्यार्थिनींनी महिला मंडळ शाळेच्या सांस्कृतिक सभागृहात रेखाटल्या होत्या. रांगोळी स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे : मोठा गट : प्रथम – राजनंदिनी चौधरी (प्रताप विद्या मंदिर), द्वितीय – अश्विनी पाटील (क.शा. वा. महाविद्यालय), तृतीय – दिपाली पाटील (क. शा. वा. महाविद्यालय). लहान गट : प्रथम – विशाखा प्रताप निकुंभे (महिला मंडळ माध्य विद्यालय), द्वितीय – ऋचा दिनेश दण्डवते (विवेकानंद विद्यालय), तृतीय – गरिमा श्रावण चौधरी (विवेकानंद विद्यालय) विजेत्या विद्यार्थिनींना लवकरच विशेष समारंभात गौरविण्यात येणार आहे.