जळगाव प्रतिनिधी । भर दिवसा धुडकू सपकाळेंसह एकावर करण्यात आलेला हल्ला हा बाजार समितीतल्या हमाल-मापाडी संघटनेच्या वर्चस्वाच्या स्पर्धेतून घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमींना पाहण्यासाठी रूग्णालयात प्रचंड गर्दी जमली असून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, हमाल-मापाडी संघटनेचे नेते तसेच नगरसेविका मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख या दोघांवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अगदी भर दिवसा चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी या दोघांवर वार केल्यानंतर त्यांनी पळ काढला असून आता पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेले धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख यांना पहिल्यांदा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना खासगी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल आहेत.
दरम्यान, अगदी दिवसा-ढवळ्या करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे जळगावात खळबळ उडाली आहे. यातील नेमके कारण हे समोर आलेले नसले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हमाल-मापाडी संघटनेतील वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे धुडकू सपकाळे आणि गजानन देशमुख यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रूग्णालयात शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आदींनी धाव घेतली आहे.