जळगाव प्रतिनिधी । कोंबड्या हुसकावल्याचा राग आल्यामुळे चुलत भावासह त्याच्या कुटूंबीयांनी तिघांवर लोखंडी रॉड, चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना शनिपेठेतील रिधुरवाडा येथे गुरुवारी घडली होती़ याप्रकरणात शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, रिधुरवाडा येथील रहिवासी अक्तर रशीद खाटीक ( ४६) यांच्या शेजारी त्यांचे चुलत भाऊ जाकीर हनीफ खाटीक यांच्याकडे सुमारे ५० कोंबड्या आहेत. या कोंबड्या अक्तर खाटीक याने कोंबड्या हुसकावल्या. याचा राग आल्यामुळे चुतल भाऊ जाकीर खाटीक याच्यासह १० ते १२ जणांनी हातात सुरा, लोखंडी पाईप घेऊन त्यांचावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात अख्तर खाटीक, फिरोजाबी खाटीक व इद्रीस खाटीक हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, अख्तर खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ पर्यंत पोलीस कोठडी
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला़ जाकीर हनिफ खाटीक (५७), आसिफ जाकीर खाटीक (२३), जुबेर जाकीर खाटीक (२०), रईस कय्युम खाटीक (२८), शरीफ उर्फ कालू कय्युम खाटीक (२६), अशपाक कय्युम खाटीक (२२, सर्व रा़ रिधुरवाडा) यांना शुक्रवारी शनिपेठ पोलिसांनी अटक केली़ त्यांना न्यायालयात हजर केले असता सुनावणीअंती या सहाही संशयितांना ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, हकीम शेख, राहुल घेटे, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे, राहुल पाटील, रवींद्र पाटील आदींनी केली.