Home क्रीडा ‘अस्मिता’ योगासन सिटी लीग २०२५-२६चे आयोजन ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या...

‘अस्मिता’ योगासन सिटी लीग २०२५-२६चे आयोजन ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

0
171

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात महिलांच्या सशक्तीकरणासोबतच योगप्रसाराला चालना देण्यासाठी ‘अस्मिता जळगाव जिल्हास्तरीय योगासन सिटी लीग २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) अंतर्गत ‘खेलो इंडिया’ आणि ‘योगासन भारत’ यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या भव्य स्पर्धेचा शुभारंभ केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांच्या उपस्थितीत २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी’, एकलव्य क्रीडा संकुल व जळगाव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमामागे सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची प्रेरणा आणि प्राचार्य प्रा. संजय ना. भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कान्ह कला मंदिरातील नवीन ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आली असून, सकाळी ८ पासून स्पर्धा सुरू होईल.

या स्पर्धेत दोन वयोगटांमध्ये मुली आणि महिलांसाठी स्पर्धा होणार असून, पहिला गट १० वर्षांवरील ते १८ वर्षे पूर्ण आणि दुसरा गट १८ वर्षांवरील ते ५५ वर्षे पूर्ण अशा स्वरूपात विभागण्यात आला आहे. खेळो इंडिया संकेतस्थळावर विनाशुल्क ऑनलाईन नोंदणीद्वारे सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना योगासन भारत निर्देशित पाच आवश्यक व दोन ऐच्छिक योगासने सादर करावी लागणार असून, आवश्यक आसनांसाठी १ मिनिट व ऐच्छिक आसनांसाठी १५ सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून योगासन भारतचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी (संगमनेर), जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, खानदेश कॉलेजचे सहसचिव अ‍ॅड. प्रवीणचंद्र जंगले, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धकांच्या कागदपत्रांची पडताळणी स्पर्धेपूर्वी करण्यात येणार असून, स्पर्धेचे संपूर्ण आयोजन आणि तांत्रिक नियोजन जळगाव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पंच यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत.

स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण ‘अस्मिता’ पोर्टलच्या युट्युब चॅनेलवर करण्यात येणार असून, पारदर्शकतेसाठी सर्व स्पर्धेचे निकाल त्याच दिवशी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण, रजत व कांस्य पदकांसह उत्तेजनार्थ प्रमाणपत्र आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या आयोजनात विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, महिला व मुलींना योगप्रति प्रेरित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Protected Content

Play sound