दोहा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धा रोमांचक वळणावर आली असून आता स्पर्धा उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. तीन सामन्यांच्या लीग फेरीत दमदार कामगिरी करत भारत अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ आणि बांगलादेश अ या चार संघांनी अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवला आहे. 21 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन्ही उपांत्य सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

गट अ मध्ये श्रीलंका व बांगलादेश अ संघांनी प्रभावी कामगिरी केली. बांगलादेशने तीनपैकी दोन सामने जिंकून चार गुणांसह उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांचा नेट रन रेट अफगाणिस्तानपेक्षा सरस ठरल्याने ते पुढे सरसावले. तर श्रीलंका अ नेही दोन विजय नोंदवीत गटात अव्वल स्थान मिळवले. अफगाणिस्तान अ ला समान गुण असूनही कमकुवत नेट रन रेटमुळे पुढे जाता आले नाही. हाँगकाँगला एका सामन्यातही विजय मिळवता आला नाही.

गट ब मध्ये पाकिस्तान अ ने जबरदस्त वर्चस्व गाजवले. सलग तीनही सामने जिंकत त्यांनी सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीत धडक दिली. भारत अ संघाने दोन विजयासह चार गुण मिळवले आणि दुसऱ्या स्थानावर समाधान मानत नॉकआऊट फेरीत प्रवेश मिळवला. ओमानला एक विजय मिळाला, तर युएईला एकही सामना जिंकता आला नाही.
उपांत्य फेरीत पहिला सामना भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात दुपारी 3 वाजता होणार आहे. दुसरा सामना पाकिस्तान अ आणि श्रीलंका अ यांच्यात रात्री 8 वाजता रंगणार असून, दोन्ही लढती तुफानी होण्याची चिन्हे आहेत. अंतिम सामना 23 नोव्हेंबर रोजी होईल.
भारताच्या दृष्टीने आतापर्यंतचा प्रवास रोलर-कोस्टर राहिला आहे. युएईविरुद्ध पहिल्या सामन्यात 148 धावांनी भेदक विजय मिळवत संघाने स्पर्धेची दमदार सुरुवात केली. मात्र पाकिस्तान अ विरुद्धचा सामना भारतीय संघासाठी धक्का ठरला, कारण त्यांनी 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत ओमानला 6 विकेट्सने हरवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. या उपांत्य सामन्यात भारत अ संघाकडून अधिक ठोस आणि संगतवार कामगिरीची अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी याच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने स्पर्धेत महत्त्वाचे सामने जिंकले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत त्याची फलंदाजी निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान व श्रीलंका हेही प्रबळ प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध झुंज देण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे उपांत्य फेरी अधिकच रोमहर्षक बनेल.



