Home उद्योग  अशोक जैन यांना ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ 

 अशोक जैन यांना ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ 

0
179


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील प्रतिष्ठित ताज पॅलेस हॉटेलच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या एक विशेष सोहळ्यात, जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांना ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन गौरविण्यात आले. कृषी, पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यामुळे केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही समाजहिताचे मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.

चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी जागतिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या तारखेला विशेष महत्त्व आहे, कारण १८९३ साली स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये दिलेले ऐतिहासिक भाषण याच दिवशी झाले होते, ज्यातून “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानाचा जागतिक प्रसार झाला.

कार्यक्रमात अशोक जैन यांच्यासह विविध उद्योग, विज्ञान, शिक्षण व सेवाक्षेत्रातील दिग्गजांना गौरविण्यात आले. यात माता अमृतानंदमयी, बाबा कल्याणी (भारत फोर्ज), विक्रम श्रॉफ (युपीएल), नादिर गोदरेज (गोदरेज इंडस्ट्रीज), मधुकर पारख (पीडीलाईट), डॉ. हुजेफा खोराखीवाला (व्होकार्ड), मनीष झावर (क्यूके टेक्नॉलॉजी), विश्वास जैन (सीईजी ग्रुप), विशाल चोरडीया (सुहाना मसाले) यांचा समावेश होता.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा होते. पुरस्कार वितरण लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, अभिनेते जॅकी श्रॉफ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, रवी अय्यर आणि गगन मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमात “ग्लोबल ह्युमॅनिटेरियन इकॉनॉमी” आणि “सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन एज ऑफ टेक्नॉलॉजी” या दोन विषयांवर परिसंवादही झाले. अनेक मान्यवरांनी या संवादात सहभागी होत आपले विचार मांडले.

पुरस्कार स्विकारताना अशोक जैन यांनी सांगितले की, “जैन इरिगेशनचे कार्य केवळ तंत्रज्ञानाधिष्ठित नव्हे, तर मूल्याधिष्ठित आहे. आमचे उद्दिष्ट कृषी, अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संतुलन साधत शाश्वत भविष्य घडवण्याचे आहे. आम्ही ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ या विचाराने प्रेरित आहोत.”

चक्र व्हिजन इंडीया फाऊंडेशनचे मुख्य मार्गदर्शक गौरांग दास, मोहनजी, आचार्य लोकेश मुनीजी, पद्मश्री डॉ. इंदीरा आहुजा, विनय सहस्त्रबुद्धे यांसह अनेक मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शन केले. वीर अवॉर्डच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सारीका पन्हाळकर यांच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला.


Protected Content

Play sound