नांदेड-प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लवकरच भारतीय जनता पक्षात दाखल होतील असा दावा भाजपच्या खासदारांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज मोठा दावा करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये येतील असे भाकीत केले आहे. खरं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून चव्हाण आणि भाजपमध्ये सलगी दिसून येत आहे. विशेष करून चव्हाण हे विरोधात असतांनाही त्यांना मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळाल्याने या चर्चेला जोर चढला आहे. तर आता थेट भाजपच्या खासदारांनीच याबाबतचा दावा केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडच्या दौर्यात वॉरियर्स सोबत बोलतांना अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे वक्तव्य केले होते. याचाच अधार घेऊन प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ते भाजपमध्ये येतील असा दावा केला आहे. अर्थात, चव्हाण हे भाजपमध्ये आल्यास आपण त्यांचे स्वागत करू असे देखील त्यांनी नमूद केले.