Home Cities जळगाव थकीत मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन !

थकीत मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेने जळगाव जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. थकीत कामाचा मोबदला तातडीने अदा करावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आशा स्वयंसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि ४ हजार ५०० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांच्या प्रतिनिधी मागण्या सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने केली जात आहेत, परंतु शासनाकडून या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांमध्ये त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, शासकीय सेवेचे फायदे लागू करावेत, आणि थकीत मोबदला त्वरित अदा करावा यांचा समावेश आहे. तसेच, आशा स्वयंसेविकांना २४ हजार रुपये, तर गटप्रवर्तकांना ३४ हजार रुपये वेतन देण्यात यावे, त्यांचा संरक्षण विमा काढण्यात यावा, आजारपणाची तसेच भर पगारी रजा देण्यात यावी, आणि कामाचा मोबदला केंद्र सरकारने २०१८ पासून वाढवलेला नाही तो तातडीने वाढवण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांचा विचार न केल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.


Protected Content

Play sound