पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीची मतमोजणी बुधवारी करण्यात आली. यात आसनखेडा बु. ग्रामपंचायतीची सत्ता परीवर्तनाकडे वाटचाल सुरु असून नगरदेवळ्यात भाजपाला झटका तर आसनखेड्यात महाआघाडीची पिछेहाट असे चित्र निर्माण झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीची मतमोजणी आज दि. २२ रोजी बुधवारी करण्यात आली. आसनखेडा बु” ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी दि. १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली होती. यात महाघाडीला ४ तर भाजप प्रणित एकता पॅनल ला ५ जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपचा एक सदस्य फुटून महाघाडीला मिळाल्याने महाआघाडीने सरपंच व उपसरपंचासह सत्ता काबीज केली होती.
दरम्यान ६ महिन्यानंतर एकता पॅनलच्या ५ सदस्यांनी राजीनामे दिल्याने ५ जागांसाठी २१ रोजी पोटनिवडणूक झाली. यात माघारीच्या दिवशी भाजपची एक जागा बिनविरोध झाली होती. मतमोजणीत भाजप प्रणित पॅनलला ५ जागा मिळाल्याने सत्ताधारी महाआघाडीकडे केवळ ४ सदस्य राहिल्याने महाआघाडीची सत्ता अल्पमतात आल्याने आसनखेडा बु” ग्रामपंचायतीची सत्ता परिवर्तनाकडे वाटचाल सुरू झाली आहे. असे असले तरी सत्ताधारी सरपंच, उपसरपंचावर अविश्वास आणण्यासाठी ९ पैकी ६ सदस्य लागणार असल्याने महाघाडीतील एखादा सदस्य फुटल्याशिवाय सत्तांतर होणे शक्य नाही.
नगरदेवळ्यात भाजपच्या उपसरपंचने अतिक्रमण केल्याने या प्रकरणी त्यांचे सदस्य पद रद्द झाल्याने एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात भाजपाचा उमेदवार तिसऱ्या स्थानी राहून शिवसेनेचे भास्कर देवराम पाटील यांना ५०७ तर राष्ट्रवादीचे मोहन फकिरा तावडे याना ५०४ मते मिळाली.
तालुक्यातील भोकरी – ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शेख नबी अब्दुल (१८८), अल्ताफ हारून काहकर (१३२), आसनखेडा – अशोक देवराम पाटील (२०६), देविदास धनराज पाटील (१८५), वैशाली आबा पाटील (१९६), सरला कैलास पाटील (१८७), पुजाबाई अमोल गायकवाड (२९०), रेश्माबाई सखाराम सोनवणे (१४०), उशाबाई रवींद्र पाटील (२७७), विमलबाई अभिमल हाटकर (१५१), पिंप्री बु” प्र. भ. – विमालबाई पांडू सोनवणे (१८८), ललिता जीभाऊ सोनवणे (१५०), खाजोळा – सुवर्णा दिपक पाटील (१४६), सरला बाळू पाटील (१०१), पहान – ममता विलास पाटील (१५२), मनुबाई भिका पाटील (१४६), लासुरे सागर प्रेमचंद देवरे (१२४), अजय रंगराव पाटील १२३ मते मिळाली.
मतमोजणीसाठी निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, निवडणूक कारकून भरत पाटील, मंडळाधिकारी संजय साळुंखे, महेंद्र पाटील, प्रकाश डहाके, प्रशांत पगार, तलाठी आर. डी. पाटील, संदीप चव्हाण, मयूर आगरकर, महेंद्र राऊतराय यांनी काम पाहिले.