Home Cities जळगाव कृत्रिम बुद्धिमत्ता ही नव्या युगाची गरज – डॉ. राकेश रामटेके 

कृत्रिम बुद्धिमत्ता ही नव्या युगाची गरज – डॉ. राकेश रामटेके 

0
116


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी “संगणकीय साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर विशेष व्याख्यान व विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल जागरूकता निर्माण करण्यासोबतच, तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात विभागप्रमुख प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी “डिजिटल सामाजिक परिवर्तन: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आंबेडकरी विद्यार्थी, प्रशिक्षक आणि अधिकारी यांना सुसज्ज करणे” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, डिजिटल युग हे केवळ माहितीच्या प्रसाराचे नव्हे, तर संधींच्या विस्ताराचे युग आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा झपाट्याने वाढणारा उपयोग लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविल्याने केवळ रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत, तर समाजातील परिवर्तनातही युवकांची भूमिका ठळकपणे अधोरेखित होईल, असेही ते म्हणाले.

प्रा. रामटेके यांनी डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा विकास करावा, ग्रामीण व सामाजिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योगदान द्यावे आणि आंबेडकरी विचारसरणीला आधुनिक माध्यमांतून सशक्त करावे, असा दृष्टिकोन मांडला. त्यांनी आंबेडकरांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्रिसूत्रीला डिजिटल युगात “शिका, सशक्त व्हा आणि सहकार्य करा” या स्वरूपात समजून घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे विषय हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून जीवनघटक बनले आहेत. विद्यार्थ्यांनी या चर्चेमधून प्रेरणा घेऊन आपले डिजिटल भविष्य मजबूत करावे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौरव कटारे या विद्यार्थ्याने केले. या प्रसंगी सहाय्यक प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा वहाणे, इतिहास विभागाचे डॉ. सावंत, अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. नव्या संधींच्या युगात समाज परिवर्तनात आपले योगदान देण्यासाठी त्यांनी डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आत्मसात करण्याचे महत्त्व ओळखले.


Protected Content

Play sound