मुंबई (वृत्तसंस्था) कला ही केवळ व्यक्तिगत नसून ते देशसेवेचे माध्यम आहे. हे लक्षात घेऊन स्वतःची प्रगती साधताना देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार सोहळा बुधवारी येथील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
डॉ. मोहन भागवत म्हणाले की, केवळ गुणवान असणे पुरेसे नाही. गुणांच्या आधारे आपल्या कर्तृत्वातून देश अधिक चांगला कसा करता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण कलेच्या माध्यमातून जे व्यक्त होते ते थेट हृदयात उतरते. त्याचा परिणाम अधिक असतो.
पुलवामातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांबद्दल बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, सीमेवर आपल्या देशाचे शूर सैनिक मोठ्या हिंमतीने अहोरात्र उभे आहेत आणि त्यामुळे आपण इथे मोकळा श्वास घेऊ शकतो. आणीबाणीच्या, संकटाच्या प्रसंगी सैनिक स्वत:चे प्राण अर्पण करतात. भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्.भगवद्गीतेत मुक्ती कोणाला मिळते याचे वर्णन करताना ती संन्याशाला आणि नंतर केवळ रणांगणावर धारातिर्थी पडणाऱ्या सैनिकालाच मिळते असे सांगितले. त्यामुळे आपल्या छतीवर गोळी झेलणाऱ्या प्रत्येकालाच स्वर्गप्राप्ती, ईश्वरप्राप्ती होते, यात कोणतीही शंका नाही.
मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकताना सरसंघचालक म्हणाले की, मा. दीनानाथ यांना कलेच्या क्षेत्रासाठीच देवाने घडवले होते. देवाने त्यांना जे दिले ते त्यांनी देशाच्या कल्याणासाठी वापरले. त्यांच्या नाटकांतून आपल्याला देशभक्ती, देशसेवा उमटललेली दिसून येते. पारतंत्र्याच्या त्या काळासाठी ते आवश्यकही होते. त्यांची नाट्यपदे, गायनाचा ढंग हे सारे समाजाला कार्यप्रवृत्त करण्यासाठी होते. समाजाला आवश्यक असणारा वीररस प्रवाहित करणारे होते. मा. दीनानाथांची ही परंपरा संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांनी जपली आहे.
मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संगीत, नाट्य, चित्रपट, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आवर्जून उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सरसंघचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजयकुमार हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मा. दीनानाथ विशेष पुरस्काराने प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान, अभिनेत्री हेलन आणि दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना गौरविण्यात आले. मा. दीनानाथ पुरस्काराने भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील नामवंत कलाकार डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना, मोहन वाघ पुरस्काराने भद्रकाली प्रॉडक्शनचे प्रसाद कांबळी यांना, आनंदमयी पुरस्काराने प. सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रम या संस्थेस, तर वाग्विलासिनी पुरस्काराने कवी वसंत आबाजी डहाके यांना सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या वतीने एक कोटी रुपयांची रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजयकुमार यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लतादीदी या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांच्या हस्ते ही रक्कम विजयकुमार यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे विविध कलाकार, सहकारी यांच्याकडूनही १८ लाख रुपयांची मदतही हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी देण्यात आली. हा निधी स्वीकारताना विजयकुमार म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर ‘भारत के वीर’ या वेबसाइटवर देशभरातील आणि परदेशातीलही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदतनिधी पाठवल्याचे सांगितले. लहान-लहान गावांमधून दहा-दहा रुपये जमा होत सुमारे वीस लाखांची मदत गोळा झाल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या दोन वर्षांत या वेबसाइटच्या माध्यमातून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत करण्यात आली होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर ही संख्या २२५ कोटींवर पोहोचली, असेही त्यांनी सांगितले.