जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला, मात्र त्यानंतरही पळून जाणाऱ्या मुलीसह तरुणाला पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथून अटक केली आहे. पळून गेल्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण आण्णा मोरे (१९, रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव) याला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील एक १६ वर्षीय मुलगी व तामसवाडी येथील लक्ष्मण मोरे यांचे प्रेम जुळले होते. त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला. त्या वेळी दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सटाणा येथे पळून गेले व तेथे एका शेतात राहिले. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले.
त्यानंतर दोघांना मेहुणबारे पोलिसांनी तामसवाडी येथून ७ जानेवारी रोजी अटक केली. सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून बलात्कार, पोस्को कलम वाढविण्यात आले. दरम्यान, लक्ष्मण मोरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. नीलेश चौधरी यांनी बाजू मांडली.