जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट व खोटे कागदपत्रे तयार करून कंडारी, भागपूर शिवारातील वनजमीन विक्री प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुकुंद बलवीरसिंग ठाकूर (५७, रा. बळीराम पेठ जळगाव) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कंडारी, भागपूर शिवारातील वनजमिनीचे खोटे सातबारा उतारे, ड पत्रक, वाघूर धरण प्रकल्पाचा ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी खोटे कागदपत्र तयार करून मुकुंद ठाकूर याने या जमिनींची विक्री केली होती. यासाठी त्याने तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह अनेकांना सोबत घेत खोटे खरेदी खत तयार करीत अनेकांची फसवणूक केली होती. या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. त्यात जमीन आहे तशाच होत्या, मात्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे पोटभाग करून त्याची विक्री झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८ डिसेंबर २०१८ या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ठाकूरचा पोलिस शोध घेत होते.
ठाकूर हा फरार असल्यापासून मोबाईल वापरत नव्हता. वापरला तरी ते सिमकार्ड लगेच फेकून देत असे. त्यामुळे तो कोठे आहे, याचे लोकेशनही मिळत नव्हते. मात्र नुकताच तो एका क्रमांकावरून बोलला आणि तो क्रमांक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक केला. त्यावरून ठाकूर हा नाशिक येथील बिटको चौकातील एका लॉजवर असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश घायवड, पोहेकॉ अशरफ शेख, पोकॉ दीपक पाटील, दीपक गुंजाळ यांच्या पथकाने ठाकूरवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले.