मुंबई प्रतिनिधी | पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटक करावे अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोले म्हणाले असल्यने यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं.
या ठिकाणी नाना पटोले म्हणाले की, ‘‘मी एवढया वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.
पटोलेंच्या वक्तव्याने खळबख उडाली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे कॉंग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. कॉंग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. कॉंग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुध्दा पटोले यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावरून आज राज्यभरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र पटोले यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पटोले हे भाषण देत नव्हते तर ते लोकांच्या गराडयात होते. लोक तक्रारी करीत होते अशी माहिती त्यांनी दिली. तरप पटोले यांनी सुध्दा या प्रकरणी सफाई दिली आहे. ते म्हणाले की, सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.