जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात शासनाच्या आदेशानुसार सील केलेले घर थकबाकीदारांनी बेकायदेशीरपणे तोडून त्यात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी, २३ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमखेडी शिवारातील सोपान लहू कोळी यांनी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडियाकडून कर्ज काढून घर घेतले होते. या घराचे हप्ते थकल्याने, जळगाव तहसीलदारांच्या आदेशानुसार बँकेने ते घर ताब्यात घेऊन सीलबंद केले होते. असे असतानाही, सोपान कोळी यांनी घराच्या दरवाजावर लावलेले सील बेकायदेशीरपणे तोडून पुन्हा घरात वास्तव्य करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित फायनान्स कंपनीच्या बँक मॅनेजरने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोपान लहू कोळी, अनिता सोपान कोळी आणि लहू नागो कोळी (सर्व रा. निमखेडी, ता. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत. शासनाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.



