धरणगाव प्रतिनिधी । माझ्या राजकीय वाटचालीच्या पहिल्या दिवसापासून झुरखेडा आणि परिसराचे ऋणानुबंध असून यातून उतराई होण्यासाठी दोन्ही गावांमधील विकासकामांना गती दिलेली आहे. आधीची पाणी पुरवठा योजना बंद करून तापी नदीवरून या दोन्ही गावांसाठी योजना मंजूर करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा करून प्रत्येक गावासाठी महत्वाचे घटक असणार्या पाणी योजना आणि शेत रस्ते डांबरीकरणावर आपला प्रमुख भर राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील झुरखेडा आणि निमखेडा येथे सुमारे एक कोटी रूपयांच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात बोलतांना ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झुरखेडा आणि निमखेडा येथे सुमारे १ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, आत्मा कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील, पं.स. सदस्य मुकुंदराव नन्नवरे, सरपंच मंगलाबाई पाटील, रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील, कांतीलाल चौधरी, डिगंबर चौधरी, शिवा मोतीराळे, संतोष पाटील, योगराज चौधरी, सतीश चौधरी, ग्रामसेवक आर.आर. निळे, सुनील चौधरी, सोपान चौधरी, साहेबराव पाटील, दगडू पाटील, शाखा प्रमुख छोटू पाटील, मुख्याध्यापक आणि शिक्षिका व परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपुजन
ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये झुरखेडा आणि निमखेडा येथे प्रत्येकी २० लाखांच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपुजन झाले. यासोबत जि.प. शाळा दोन खोल्या बांधकाम (१७.५ लक्ष); परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे (३ लाख); गाव अंतर्गत कॉंक्रीटीकरण
(६ लक्ष); भूमिगत गटर बांधकाम ( ८ लक्ष); आर.ओ. अर्थात जलशुध्दीकरण प्लांट ( ५ लक्ष ); झुरखेडा – सतखेडा रस्ता खडीकरण (१० लक्ष ) आणि साठवण बंधारा दुरूस्ती ३ लक्ष या कामांचा समावेश आहे. तर निमखेडा येथे आंगणवाडी बांधकाम (८.५ लक्ष); स्मशानभूमि दुरूस्ती (३ लक्ष ) या कामांचे भूमीजन करण्यात आले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून झुरखेडा आणि निमखेडा गावांबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, पंचायत समिती सदस्य असल्यापासून १९८७ पासून हे गाव माझ्या पाठीशी सातत्याने उभे राहिले आहे. त्यांनी दिलेला विश्वास हा आपण कधीही तोडला नाही. खरं तर विश्वास संपादनातून साधलेला विकास हा कायमस्वरूपी असतो. याच प्रकारे दोन्ही गावकर्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. झुरखेडा गावातील प्रेम हे बाजारात मिळण्यासारखे नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते पुढे म्हणाले की, झुरखेडा आणि निमखेडा येथील पाणी पुरवठा योजना जुन्या झाल्या असून त्यायोजना आहे त्या स्थितीत क्लोज करण्याचे निर्देश मी दिले आहेत. या दोन्ही गावांसाठी लवकरच नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झुरखेडा ते धार, झुरखेडा ते बोरखेडा या रस्त्यांच्या बळीकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. झुरखेडा ते वंजारी या रस्त्यावरील पुलाला मंजुरी देण्यात आली असून ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झुरखेडा ते खपाट आणि झुरखेडा ते धार या रस्त्यांसाठी भरीव तरतूद येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, अंगणवाडी बांधकाम व शाळा खोल्या बांधकाम दर्जेदार करा, याच्या क्वॉलिटीत कोणतीही तडजोड करता कामा नये असे ना. गुलाबराव पाटलांनी बजावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कांतीलाल पाटील सर यांनी केले.
वडलांसमोर प्रतापभाऊंचे पहिलेच भाषण !
झुरखेडा आणि निमखेडा येथील कार्यक्रम हा एका बाबतीत ऐतिहासीक ठरला. पालकमंत्र्यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे आजवर आपले वडील असतांना कधीही व्यासपीठावर बसले नसून त्यांनीत्यांच्या समोर कधी भाषण देखील केले नाही. या कार्यक्रमातही ते श्रोत्यांमध्येच बसून होते. मात्र याप्रसंगी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या वडिलांच्या उपस्थितीत भाषण केले अन् उपस्थितांनी याला जोरदार प्रतिसाद देखील दिला.