Home Cities जळगाव अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक: पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केला गौरव !

अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक: पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केला गौरव !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील महसूल, महावितरण, बांधकाम, वन विभाग यांसह इतर विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या समन्वयामुळे डीपीडीसीच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले. डीपीडीसीमध्ये निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याने पुणे जिल्ह्यालाही मागे टाकत एक नंबर मिळविला आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, रेल्वे विभागाच्या प्रबंधक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल किरणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “जळगाव प्रशासनाचे यावर्षीचे काम गौरवास्पद आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वच अधिकाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामांना गती दिली आहे. गेल्या वर्षी आपण डीपीडीसीचा शंभर टक्के निधी खर्च केला आहे. त्या माध्यमातून महावितरण, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, महसूल आणि इतर विभागांमध्ये चांगली कामे झाली आहेत. खरं तर आम्ही नाममात्र आहोत, परंतु खरे काम करणारे अधिकारी व कर्मचारी तुम्ही आहात. त्यामुळे तुमचा गौरव केला पाहिजे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी मी विरोधात होतो, त्यावेळी अधिकाऱ्यांना कामाला लावायचो, आता सत्तेत असल्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेतो. अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काम होत नाही, हे सिद्ध झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सिटीस्कॅनसारखी मशीन उपलब्ध झाल्याने अवयवांचे प्रत्यारोपण वगळता इतर सर्व सुविधा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अव्वल ठरले आहे.”

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महसूल, महावितरण, बांधकाम, वन विभाग यांसह इतर विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कामांमध्ये अधिक गती आणण्याचे निर्देश दिले. तसेच, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound