जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोना महमारीच्या याकाळात शैक्षणिक, मानसिक तथा योगिक समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती महाराष्ट्रातील गरजवंतास टेलिफोनिक समुपदेशन करणार आहे. सदर समुपदेशन निशुल्क आहे.
मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावर योग शिक्षकांची एक संघटना तयार करण्यात आली आणि त्यामाध्यमातून योग शिक्षण आणि त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. संघटनेचे राज्याच्या २५ जिल्ह्यात कार्यकारणी तयार झाली असून योग शिक्षकांची अडचण सोडविणे, शैक्षणिक स्तरावर योग विषय सुरु करणे, जनसामन्यांमध्ये योगाची आवड उत्पन्न करून सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्धता ठेवत अनेक जनहिताचे कार्य संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
नुकतेच कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले असुन अनेक परिवार यात होरपळले जात आहेत. त्यात त्यांच्या शारीरिक तथा मानसिक नुकसान होत आहे. अशावेळी हतोस्ताहित झालेल्या समाजास आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय तज्ञांची एक समिती तयार केली असून ही समिती गरजवंतास टेलीफोनिक समुपदेशन देणार आहे. तसेच संघटनेच्या फेसबुक पेजवरून दररोज सायंकाळी योगसाधना आणि विशेष मार्गदर्शन कार्यक्रम लाईव्ह करण्यात येणार आहे.
सदर समिती मध्ये राहुल येवला, प्रा.कृणाल महाजन, शुभांगी रत्नपारखी, लता होलगरे, अंजली देशपांडे, वैशाली पाटील, डॉ. गणेश सव्वालाखे, डॉ. वसुधा मोरे, वसंत केळकर, मंदाकिनी गीते आदी तज्ञ मान्यवर असणार आहे. सदर समिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.मनोज निलपावर यांनी नियुक्त केली असून राज्यातील नागरिकांनी आपल्या शारीरिक तथा मानसिक समस्यांसाठी वरील तज्ञांची मदत घ्यावी असे आवाहन प्रदेश महासचिव हर्षिता बम्बुरे यांनी केले आहे.