जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी विभागाच्या प्रचलित योजनेतंर्गत यांत्रिकीकरण या बाबीसाठी अनुदान देणेकरिता शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी राज्य शासनाचेhttp://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल कार्यान्वित झाले आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे अर्ज या पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित औजारे व स्वयंचलित औजारे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा लाभ मिळण्यासाठीचे अर्ज या पोर्टलवर स्वीकारले जातील. याअनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतः अर्ज करावा अथवा नजीकच्या सेतू/सीएससी सेंटरला भेट देऊन अर्ज करावा. यामध्ये नोंदणी करताना आधारकार्डाचे प्रमाणीकरण करण्यासाठी अडचणी येत असल्यास आधार कार्ड नाही हा पर्याय निवडहून नोंदणी करून अर्ज भरण्यात यावेत. तथापि, संबंधितांना पूर्व संमती मिळाली तर आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.