जळगाव प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या व्यापारी संकुलात परवानगी मिळाल्यापेक्षा तिप्पट क्षेत्रावर बांधकाम करून कोट्यवधींचा घोळ करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय भास्कर पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून यात संचालकांसह ठेकेदार व राजकीय मंडळींचा सहभाग असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय भास्कर पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारात १८४ गाळे बीओटी तत्वावर विकसीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यास शासनाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी परवानगी दिली. त्यानुसार निविदा काढण्यात येवून संबंधित बांधकामाचा ठेका हा पराग कन्स्ट्रक्शन यांना मिळाला. त्यांनी शासनाच्या परवानगीनुसार १३५२.१० चौरस मीटर एवढे निर्धारीत करुन दिलेल्या क्षेत्रानुसार बांधकाम करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता ३९२८.५१ चौरस मीटर एवढे वाढीव बांधकाम केले. शासनाच्या परवानगीपेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढीव बांधकाम करण्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ॲड.विजय पाटील यांनी केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलाच्या जागेचे बांधकाम करत असतांना याठिकाणी महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने संबंधित व्यापारी संकुलाच्या बांधकाम परवानगी मिळत नव्हती. याठिकाणचे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार होती. अखेर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर संबंधितांच्या कार्यकाळात याठिकाणी बांधकामास महापालिकेकडून परवानगी मिळाली. यात शहराचे आमदार सुरेश भोळे यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोपही ॲड. विजय पाटील यांनी केला.
ॲड. विजय पाटील यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येवून बाजार समितीतील व्यापारी संकुलाच्या बांधकामा झालेल्या गैरव्यवहाराच्या बाबतच्या चौकशीसाठी शासनाकडून तीन सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज १८ मे रोजी शासनाने काढेल आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन, मंडळाचे नाशिक येथील विभागीय कार्यालयाचे विभागीय सरव्यवस्थापक सी.एम.बारी हे समितीप्रमुख असून सदस्य म्हणून पणन विभागीय कार्यालय नाशिक येथील कनिष्ठ अभियंता हेमंत अत्तरदे, व जळगाव येथील सहाय्यक निबंधक व्ही.एम.गवळी यांचा समितीत समावेश आहे.