मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर केला असून याच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच कोविडमुळे राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका प्रलंबीत आहेत. मध्यंतरी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीच्या याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. तर राज्य सरकारने या निवडणुकीत शेतकर्यांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका नेमक्या केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या पार्श्वभूमिवर, आज राज्य सहकारी प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत संपलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. याचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, २७ मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. २७ मार्च ते ३ एप्रिलच्या दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. छाननी होऊन दिनांक ६ ते २० एप्रिलच्या दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून यानंतर तीन दिवसांच्या आत निकाल लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे. आता येथे निवडणुका होणार आहेत. यामुळे आता सहकार क्षेत्रातील वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.