नवी दिल्ली प्रतिनिधी । सध्याच्या काळात अपघाताचे प्रमाण प्रंचड वाढत आहे. त्यातच रस्तेवरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी बरेच लोक त्याचा व्हिडीओ काढतात. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांवर पोलिसांनीही जरब बसवण्यास प्रयत्न सुरू केले आहे. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला अपघात झाला असेल आणि तिला मदत करण्याऐवजी इतर व्यक्तीनं तिचा व्हिडीओ बनवल्यास पोलीस त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल.
यासाठी ट्रॅफिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेणार असून, अशा प्रकारे कोणताही वाहन चालक दुसऱ्या अपघातग्रस्त व्यक्तीचा व्हिडीओ बनवत असल्याचं निदर्शनास आल्यास त्या वाहन चालकाची ओळख करुन, नंतर त्या वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अशा बऱ्याच अपघातात रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अपघात झाल्यानंतर उपस्थित लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात किंवा व्हिडीओ काढण्यात मश्गुल असतात. त्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कोणीही पुढे जात नाही किंवा त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करत नाहीत. त्यामुळे जास्त करून जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो. ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे आणि यमुना एक्स्प्रेस वे वर असे प्रकार करणाऱ्यांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यात अपघात झाल्यानंतर वाहन थांबवून उभं राहणं किंवा मोबाइलवर त्याचं चित्रीकरण करणाऱ्या लोकांवर मोटार वाहन अधिनियम कलम 122 आणि 177अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, गुन्हा दाखल केला जाणार आहे. असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.