नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. टप्प्याटप्प्याने आणखी २२ लढाऊ हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल होतील. सर्वात शक्तिशाली आणि अचूक मारा करण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये आहे, अशी माहिती हवाई दलाचे प्रवक्ता अनुपम बॅनर्जी यांनी दिली. अपाचे एएच-६४ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ हेलिकॉप्टर आहे. मार्चमध्येच भारतीय हवाई दलाच्या छत्तीसगड हवाई तळावर अत्याधुनिक चिनुक हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला होता.