जिद्द आणि प्रयत्नांद्वारे कोणतेही लक्ष्य साधता येऊ शकते !- कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “तुम्हाला काय मिळवायचे आहे, हे आताच ठरवणे गरजेचे आहे. त्या उद्दिष्टानुसार तुमची दिनचर्या ठरवावी लागेल. शिस्तबद्ध दिनचर्या यशाकडे नेण्याचा मार्ग आहे. प्रत्येक दिवस ठरवलेल्या उद्दिष्टासाठी समर्पित करा. योग्य नियोजन आणि सातत्य यामुळे तुमचे स्वप्न नक्की साकार होईल”; असा सल्ला व्याख्याते कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे आज २० रोजी जी.एस.चौधरी विद्यालय, वरणगाव येथे माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प फैजपूर येथील कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी गुंफले. ‘गगन कवेत घेवूया’ या विषयावर ते बोलत होते. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्यध्यापक एम.आर.चौधरी , संचालक मोरेश्वर फिरके, प्रकल्प प्रमुख डॉ.संजू भटकर, सहसमन्वयक प्रा.डॉ.शाम दुसाने, सहसमन्वयक हितेंद्र नेमाडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रकल्प सह समन्वयक हितेंद्र नेमाडे यांनी अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या विषयी कृतज्ञता म्हणून दरवर्षी पुष्पांजली प्रबोधन मालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम.आर.चौधरी यांनी, अंतर्नाद प्रतिष्ठान माणसांच्या गर्दीत माणुसकी शोधण्याचे काम करत असल्याचे सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांसारखे महान आदर्श आपल्यासमोर आहेत. चेसमध्ये इतक्या कमी वयात जागतिक विजेता झालेला गुकेश प्रेरणादायी उदाहरण आहे. आपण कोणाला आदर्श मानतो, हे आपल्या यशाचा मार्ग ठरवते. ठरवले तर आपण काहीही करू शकतो, फक्त जिद्द आणि प्रयत्न गरजेचे आहेत. आई-वडील आणि शिक्षकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण केली पाहिजे”, असा सल्लाही कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

“येणारा काळ संघर्षाचा आहे. पैसा कसा ही कमावता येतो, पण गमावलेला वेळ पुन्हा मिळत नाही. स्वतःला घडवायचे असेल तर कठोर मेहनत करावी लागेल. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, त्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल”, असेही कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.

प्रबोधनमालेसाठी रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सूत्रसंचालन सुनीता कापसे यांनी केले तर आभार डॉ.संजू भटकर यांनी मानले. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य देव सरकटे, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content