जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीआयएससीई बोर्डच्या (CISCE Board) एच झोनल तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत अनुभूती स्कूलने १३ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला, ज्यामुळे त्यांच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद झाली.
अनुभूती निवासी स्कूल येथे १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मॅट पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य रवींद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे सदस्य अजित घारगे, प्रशिक्षक जयेश बाविस्कर, सौ. स्मिता बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंचा पदक देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धा आधुनिक सेन्सर सिस्टीम्सवर घेण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत अशोका युनिव्हर्सल स्कूल नाशिक, केब्रिज स्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, बारनेस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अनुभूती स्कूल जळगाव, रयान इंटरनॅशनल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या सात संघांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पदक विजेत्यांमध्ये अनुभूती स्कूलच्या खेळाडूंचा दबदबा:
१४ वर्षांखालील गटात: साधना देशमुख (सुवर्ण), भूमी धर्मशाली (रौप्य), अनुभूती चौधरी (रौप्य) यांनी अनुभूतीसाठी पदके जिंकली.
१७ वर्षांखालील गटात: साची पाटील (सुवर्ण), समिक्षा पवार (सुवर्ण), भाविका पाटील (सुवर्ण), दिया देशपांडे (सुवर्ण), जान्हवी जैस्वाल (सुवर्ण), शाहिनी जैन (सुवर्ण), आदिती कुकरेजा (सुवर्ण), किंजल धर्मशाली (रौप्य), भव्या अग्रवाल (रौप्य) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १९ वर्षांखालील गटात: मुक्ती ओसवाल (सुवर्ण), समृद्धी कुकरेजा (सुवर्ण), पलक सुराणा (सुवर्ण), अलफेया शाकिर (सुवर्ण), स्पर्श मोहिते (सुवर्ण) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
मुख्य पंच म्हणून स्मिता बाविस्कर, श्रेयांग खेकारे, पुष्पक महाजन यांनी जबाबदारी सांभाळली. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूल, जैन स्पोर्टस अकॅडमी आणि जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पलक सुराणा हिने सूत्रसंचालन केले. अनुभूती स्कूलच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.



