जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. उल्हास पाटील धर्मार्थ रूग्णालयात आजपासून रोगप्रतिबंधक लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयात जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने शुक्रवार दि.१९ रोजी नवजात शिशूंपासून ते १६ वयोगटातील बालकांसाठी रोगप्रतिबंधक लसीकरण केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हासदादा पाटील म्हणाले की, नवजात शिशूंपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांना आवश्यक असलेल्या लस आता येथे दिल्या जाणार आहे. त्याकरीता रुग्णालयात स्वतंत्र यंत्रणा सज्ज झाली असून कुठल्याही वेळी येथे आलेल्या प्रत्येक बालकाला लस देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण, नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.इरेश पाटील यांची विशेष उपस्थीती होती. मान्यवरांच्याहस्ते फित कापून व दहा बालकांना प्रातिनिधिक स्वरुपात पोलिओसह अन्य आवश्यक लसी देऊन लसीकरण केंद्राचे थाटात उद्घाटन झाले. सर्व प्रकारच्या लस येथे उपलब्ध आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, गोदावरी नर्सिंगच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.सुभाष बडगुजर, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.निलेश बेंडाळे, बालरोग विभागप्रमुख डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.उमाकांत अणेकर हे उपस्थीत होते. मान्यवरांच्याहस्ते सर्वप्रथम दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले. यानंतर बालरोग विभागातर्फे मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी डॉ.उमाकांत अणेकर यांनी प्रास्ताविकात डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाची माहिती दिली तसेच लसीकरण केंद्र सुरु करुन आज बालरोग विभाग पूर्णत्वास गेला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ.संजय चव्हाण यांनी लसीकरण देण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तसेच लस देतांना कशी काळजी घ्यावी ते सांगितले, लसीकरणासाठी शासनाने एवढ्या मोठ्या खाजगी रुग्णालयाला काम दिले ही गौरवाची बाब असल्याचेही डॉ.चव्हाण म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी बालरोग विभागातील डॉ.विक्रांत देशमुख, डॉ.गौरव पाटेकर, डॉ.दर्शन राठी, मेट्रन संकेत पाटील, किर्ती पाटील यांच्यासह रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी बालरोग विभाग, पीआरओ सचिन बोरोले, गजानन जाधव, नर्सिंग स्टेशन, तांत्रिक सहाय्यासाठी भुषण चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिडीया विभाग प्रतिनिधी गौरी जोशी यांनी केले.