जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिजामाता माध्यामिक विद्यालयात पहिल्यांदाच ‘ध्रुवीय महिला’ डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर यांनी आज भेट दिली. अंटार्टिका हा भूतलावरील स्वर्ग असून तेथील निसर्गाची साक्ष देते. मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नसल्यानेच हे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. मधुबाला यांनी केले. विद्यालयातील आशा फाउंडेशनच्या शार्प प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर यांच्यासह इतर पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी गिरीष कुळकर्णी यांनी थोडक्यात परिचय करुन दिला. डॉ. चिंचाळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारताहून 5 पट मोठा अंटार्टिका खंड आहे. 20 व्या शतकापर्यंत या खंडात माणूस पोहचू शकला नव्हता. अंटार्टिकातील वातावरण आठ महिने हिवाळा म्हणजे टोकाची थंडी आणि चार महिने उन्हाळा असे आहे. अशा परिस्थितीत साधारण वर्षभर जाऊन राहणे हे अंतराळात जाऊन राहण्यासारखं आहे. यावेळी हिवाळयात तेथे संशोधनासाठी गेलेल्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या टीमचा जगाशी संपर्क नसतो. तसेच त्यांनी काही माहिती आपल्या लॅपटॉपच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना छायाचित्रांद्वारे दिली. तेथील, निसर्ग व प्राणिमात्रांबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या गोष्टी ऐकतांना आश्चर्य व कुतूहल वाटत होते. अंटार्टिका प्रमाणे पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी मानवाने चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याध्यापक खोरखेडे यांनी सांगितले की, आमचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. त्यांना इतकी चांगली माहिती मिळाली असे सांगून त्यांनी पाहुण्यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ.भगवतीप्रसाद चिंचाळकर यांच्याबरोबर विद्यालयातील शिक्षकांसह मीनाक्षी सुतार, कल्पना शिंपी, अदिती कुळकर्णी, विनिता भट, रेवती राजहंस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय खैरनार यांनी केले.
जाणुन घेऊया डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर यांच्याकडून अंटार्टिका खंडाविषयी, तिथल्या वातावरणाविषयी आणि तिथे आलेल्या अनुभवांविषयी