जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील तांबापुरा भागातील तीन तरुणांचा धुळे येथे जात असताना फागणे गावाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातातील एक जण जागीच ठार झाला होता. इतर दोघांवर उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी २२ जून रोजी सकाळी ६ वाजता यातील अरबाज खाटीक (वय २२, रा. तांबापुरा,जळगाव) या तरुणाचा उपचार सुरू असताना जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार १९ जून रोजी धुळे येथे एका कामानिमित्त तांबापुरातील जुनेद शेख, अरबाज खाटीक, सलमान खाटीक हे तीन तरुण दुचाकीने निघाले होते. धुळे जवळील फागणे गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला होता.
या अपघातात जुनेद शेख याचा मृत्यू झाला होता तर अरबाज खाटीक याच्यावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. तर तिसरा जखमी सलमान खान याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान उपचार सुरू असताना शासकीय रुग्णालयामध्ये अरबाज खाटीक याचा शनिवारी २२ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे तांबापुरावर पुन्हा एकदा शोककळा पसरली असून तरुणांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.