मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी सलग दोन दिवस घडलेल्या घटनांनी सत्ताधारी आघाडीतली दुफळी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंचावर एकत्र दिसले, मात्र शिंदे यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली.

मंगळवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या प्रकारानंतर महायुतीत नाराजी आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. संध्याकाळपर्यंत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी “तोडगा निघाला असून गैरसमज दूर झाले” अशी भूमिका घेतली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी पुन्हा एका अधिकृत कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने परिस्थिती पूर्ववत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पातळीवरील उपस्थितीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे विविध तर्क–वितर्कांना उधाण आले आहे. यामागचे कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन दिवसांत सलग दोन वेळा अशा पद्धतीच्या घटना घडल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. सत्तासमीकरण आणि निर्णय प्रक्रियेतील असंतोष याचे प्रतिबिंब अशा घटनांतून उमटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यापूर्वीही उमेदवारी वाटप, मंत्रीपदांचे वितरण आणि विविध प्रशासकीय निर्णयांवरून शिवसेना शिंदे गटात नाराजी असल्याच्या चर्चा वेळोवेळी होत आल्या आहेत. आजच्या अनुपस्थितीमुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीला एकजूट दाखवणे अत्यावश्यक आहे, मात्र अलीकडच्या घटनांनी त्याला गालबोट लागल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.



