Home Cities जामनेर जामनेर तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

जामनेर तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज पंचायत समिती हॉलमध्ये प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या सोडत सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा चार प्रवर्गांनुसार १०७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, महिला आरक्षणासाठीची चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रिया प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. यासाठी ७ वर्षांच्या कुमारी डिंपल पवार हिच्या हस्ते पारदर्शक बरणीमधून चिठ्ठ्या काढून महिला सरपंच आरक्षणासाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

आरक्षणानुसार तपशील पुढीलप्रमाणे आहे:

अनुसूचित जाती: १० ग्रामपंचायती (त्यापैकी महिलांसाठी ५ जागा)
अनुसूचित जमाती: १५ ग्रामपंचायती (त्यापैकी महिलांसाठी ८ जागा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग: २९ ग्रामपंचायती (त्यापैकी महिलांसाठी १५ जागा)
सर्वसाधारण प्रवर्ग: ५३ ग्रामपंचायती (त्यापैकी महिलांसाठी २७ जागा)

यानुसार, जामनेर तालुक्यातील एकूण ५५ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या सोडत प्रक्रियेत प्रशासकीय पारदर्शकता, कायदेशीरता आणि लोकसहभाग यावर विशेष भर देण्यात आला. सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून समाधानकारक वातावरणात ही सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound