नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत’ आणि ‘अमृत’ या योजनांच्या नव्या आवृत्तींची अर्थात ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.०’ आणि ‘अमृत २.०’ या योजनांची घोषणा केली असून या माध्यमातून शहरे कचरामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० आणि अमृत २.० या दोन नव्या उपक्रमांमुळे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणार्या समस्यांचा सामना करणे शक्य होईल. यामुळे शहरे हे अधिक उत्तम होतील. आगामी काळात कचर्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवरून १०० टक्क्यापर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
पाण्याच्या साठ्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अमृत २.० योजनेसाठी २.८७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढवणे आणि आपल्या शहराला जल संरक्षित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांमसोर ठेवण्यात आले आहे. देशातील १०.५ कोटी जनतेला याचा लाभ मिळेल असे पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि राज्यमंत्री उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आज भारत दररोज सुमारे एक लाख टन कचर्यावर प्रक्रिया करत आहे. जेव्हा देशाने २०१४ मध्ये मोहीम सुरू केली, तेव्हा देशात दररोज निर्माण होणार्या २० टक्के पेक्षा कमी कचर्यावर प्रक्रिया केली जात होती. आज आपण दररोज सुमारे ७० टक्के कचर्यावर प्रक्रिया करत आहोत. आता हे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे. तर, ऑगस्ट महिन्यातच देशाने राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी सुरू केली आहे. हे नवीन स्क्रॅपिंग धोरण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.