राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ची घोषणा; चार खेळाडूंना खेलरत्न

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकेर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार या चार क्रीडापटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मनू भाकरने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंकले होते. 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत ती तिसरी राहिली. तिच्या दोन पदकांच्या जोरावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदके जिंकली. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने 11 डिसेंबर रोजी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने फायनलमध्ये चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनचा 7.5-6.5 असा पराभव केला आणि एवढ्या कमी वयात विजेतेपद पटकावणारा गुकेश हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1985 मध्ये रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने वयाच्या 22व्या वर्षी हे विजेतेपद पटकावले होते.

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक आणि 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर हरमनप्रीतने तीन वेळा एफआयएच पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रवीणने T64 स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि 2.08 मीटरची उंची पूर्ण करत इतिहासात आपले नाव नोंदवले.

Protected Content