Home Cities जळगाव अंनिस जळगाव शहर शाखेची कार्यकारणी जाहीर

अंनिस जळगाव शहर शाखेची कार्यकारणी जाहीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेची नवीन कार्यकारिणी नुकतीच एका विशेष बैठकीत एकमताने जाहीर करण्यात आली. या निवडीत शाखा कार्याध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिनाक्षी विश्वजीत चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर प्रधान सचिवपदी हेमंत रघुनाथ सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीवर आणि कार्यदिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीसाठी राज्याचे पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शवली, तर राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. बैठकीच्या सुरुवातीला आगामी काळातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय विज्ञान दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वैज्ञानिक व सामाजिक जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

निवड प्रक्रियेदरम्यान प्रा. डी. एस. कट्यारे यांनी मिनाक्षी चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. मिनाक्षी चौधरी यापूर्वी मानसिक आरोग्य व्यवस्थापन प्रकल्प विभागाच्या जिल्हा कार्यवाह म्हणून कार्यरत होत्या. मात्र, संघटनेच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या धोरणाचे पालन करत त्यांनी जिल्हा पदाचा राजीनामा देऊन शहर शाखेचे कार्याध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यांच्या निवडीमुळे जळगाव शहरातील अंनिसच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

कार्यकारिणीमधील अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी यशवंत बारी आणि उपाध्यक्षपदी अजित चौधरी यांची निवड करण्यात आली असून, हेमंत सोनवणे यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांची सचिवपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच विविध विभागांसाठी कार्यवाह नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पासाठी आनंद ढिवरे, युवा सहभागासाठी गुरुप्रसाद पाटील, महिला सहभागासाठी प्रा. डॉ. कल्पना भारंबे आणि बुवाबाजी संघर्ष विभागासाठी जितेंद्र धनगर यांची निवड झाली आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला ॲड. भरत गुजर, अजय जाधव, विलासराव देशमुख, प्रमोद पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या दमाच्या या कार्यकारिणीमुळे शहरात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात तळागाळापर्यंत पोहोचेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound