अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेसोबत भेट घडवून आणली. यावेळी राजकीय स्थितीबाबत तिघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीतील अनिल पाटील यांच्या उमेदवारीत अचानक बदल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. स्वत: अनिल पाटीलही त्यामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर अरुणभाई गुजराथी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणली होती. यावेळी लवकरच पक्षाच्या प्रदेश पातळीवरील जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल, असे संकेत शरद पवार यांनी दिले असल्याचे वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत जळगाव मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे, यासाठी जोमाने कामाला लागावे, पक्ष आपल्या पाठीशी आहे, असेही शरद पवार यांनी त्यांना यावेळी सांगितले आहे. यावर अनिल पाटील यांनी देखील आपले आदेश हे आमच्यासाठी प्रमाण असून संपूर्ण ताकदीनिशी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही खा.पवार यांना दिली आहे. यापुढे मात्र सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक हे ही उपस्थित होते. या भेटीमुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.