मुंबई । मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार आहे.
१०० कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल रात्री उशीरा अखेर अटक करण्यात आली आहे. अनेकदा समन्स बजावूनही ते ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले नव्हते. मात्र काल पावणेबाराच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात गेले. यानंतर सुमारे १३ तास चौकशी झाल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. मनी लॉंड्रिंगसह विविध कलमांखाली ही सर्व कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, आज सकाळी अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी ईडीने त्यांना १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची अर्थात सहा नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांची दिवाळी तुरूंगात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.