अमळनेर-गजानन पाटील (Exclusive Analysis) | एकीकडे मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात जिल्ह्यातून कुणाला स्थान मिळेल याची चर्चा सुरू असतांना आज अकस्मातपणे अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्याने सर्वांना धक्का बसला असून यातून जिल्ह्यात मराठा समाजाला तब्बल अकरा वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
आज राज्याच्या राजकीय वर्तुळाला जसा धक्का बसला अगदी तसाच जळगावच्या राजकारण्यांनाही बसला. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असून यात जळगाव जिल्ह्यातून कुणाला संधी मिळेल ? याबाबत मोठी चर्चा सुरू होती. आज मात्र अकस्मातपणे अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी सरकारला पाठींबा देत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वच जण स्तब्ध झाले. यातील लक्षणीय बाब म्हणजे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यांना कोणते खाते मिळेल तसेच ते कॅबिनेट मंत्री असतील की राज्यमंत्री याबाबतची माहिती यथावकाश समोर येईलच. मात्र आजच्या त्यांच्या शपथविधीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
हे देखील वाचा : अनिल भाईदास पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
आजवर जळगाव जिल्ह्यातील तीन सर्वात मोठ्या बलाढ्य नेत्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांचा समावेश होता. यातील पहिले दोन नेते गुर्जर तर तिसरे हे लेवा पाटीदार समाजाचे आहेत. खरं तर जिल्ह्यात मराठा समाजाचे अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत. यात उन्मेष पाटील यांच्या रूपाने खासदार तर चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण आणि अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून आमदार आहेत. जिल्हा बँक, दुध संघ आदींसारख्या महत्वाच्या संस्थांवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. मात्र जिल्हा आणि राज्य पातळीवर असलेल्या दबदब्याचा विचार केला असता फक्त आणि फक्त दोन्ही मंत्री आणि एकनाथराव खडसे यांचीच नावे समोर येत असत हे कुणी अमान्य करणार नाही. आता मात्र अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून याला चौथा चेहरा मिळाला असून हीच बाब लक्षणीय अशी मानावी लागणार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला असता मराठा समाज हा बहुसंख्य असून देखील फार अल्प काळ महत्वाच्या राजकीय पदांवर राहिलेला आहे. एकविसाव्या शतकाचा विचार केला असता २३ वर्षांमध्ये डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या दोन्ही मान्यवरांनाच फक्त राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली, अर्थात दोघांना पाच वर्षे मंत्रीपद मिळाले नाही. गुलाबराव देवकर हे पहिल्याच फटक्यात आमदार झाल्यानंतर राज्यमंत्री झाले. पवार कुटुंबाच्या विश्वासातील नेते म्हणून ते गणले जाऊ लागले. मात्र घरकूल प्रकरणात त्यांना अटक झाली. यामुळे जवळपास तीन वर्षाच्या मंत्रीपदानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि नंतर त्यांची कारकिर्दच झाकोळली गेली.
गुलाबराव देवकर यांना ऑगस्ट २०१२ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर तब्बल पावणे अकरा वर्षापर्यंत मराठा समाजातील कोणताही नेता हा मंत्रीपदापर्यंत पोहचला नाही. यानंतर आज अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला मंत्रीपद मिळाले आहे. जिल्ह्यातील दोन गुर्जर समाजाच्या मंत्र्यांच्या जोडीने ते काम करणार आहेत. येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यात त्यांच्या नेतृत्वाची कसोटी देखील लागणार आहे. अर्थात, येणारा काळच त्यांच्या आगामी वाटचालीचे मूल्यमापन करणार आहे. मात्र आजच सामाजिक दृष्टीने विचार केला असता मराठा समाजाला मंत्रीमंडळात मिळालेले प्रतिनिधीत्व हे मोठ्या प्रमाणात लक्षणीय असून याचे व्यापक परिणाम होतील अशी शक्यता आहे.