मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाची शपथ घेतलेले ना. अनिल भाईदास पाटील Anil Bhaidas Patil-Amalner यांच्याकडे मदत व पुनर्वसन या विभागाची जबाबदारी आली असून आज याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
या महिन्याच्या प्रारंभी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या सहकार्यांसह राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर लागलीच काही तासांमध्ये त्यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी देखील झाला. यात अमळनेरचे आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
यानंतर ना. अनिल पाटील यांना नेमके कोणते खाते मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यामध्येच बर्याच दिवसांपर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातीच न मिळाल्याने चर्चेला उधाण आले होते. ही कोंडी अखेर आज फुटली असून नवीन मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. यात ना. अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन पुरवठा हे वजनदार खाते आले आहे. पहिल्या आमदारकीमध्येच कॅबिनेट मंत्रीपद पटकावल्यानंतर अयाच्यासारखे महत्वाचे खाते मिळाल्याने ना. अनिल पाटील यांची राजकीय उंची वाढल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले असून यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नियोजन व अर्थखाते मिळाले आहे. यासोबत दिलीप वळसे पाटील यांना सहकार तर छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा; धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रालय मिळाले आहे. महिला व बालकल्याणची धुरा अदिती तटकरे यांच्याकडे आली असून हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, धर्मराव आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन तर संजय बनसोडे यांना क्रीडा खाते मिळाले आहे.