मुंबई (वृत्तसंस्था) रिलायन्स कॅपिटलमधील रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) या दोन कंपन्या संकटात सापडल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांचे रेटिंग प्रमाणापेक्षा अधिक घटले आहे. त्यामुळे रिलायन्स कॅपिटल या दोन कंपन्यांसाठी नव्या गुंतवणूकदारांच्या शोधात आहे, अशी विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपमधील रिलायन्स कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बाफना यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही आता देश-विदेशातील गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहोत. आगामी दोन ते तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कंपनीची वाढ होण्यासाठी नव्या गुंतवणूकदारांची मदत होईल. यामुळे क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा होऊ शकेल, असे ते म्हणाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नव्या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून आरएचएफएल आणि आरसीएफएल तीन हजार कोटी रुपये जमा करण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष व्यवहारावेळी या रकमेत वाढही होऊ शकते. आताच्या घडीला आरएचएफएल आणि आरसीएफएल कंपन्यांवर अनुक्रमे १७ हजार कोटी आणि १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.