मेलबर्न-वृत्तसंस्था | ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍन्ड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला असून यामुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.
क्विन्सलॅण्डमधील ऍलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडच्या गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून बाजूला जाऊन उलटल्याची माहिती पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात दिली. ४६ वर्षाच्या या अष्टपैलू खेळाडूच्या मृत्यूने क्रिकेटविश्वाला हादरा बसला आहे. विशेष करून ऑस्ट्रेलियक क्रिकेट क्षेत्रासाठी हे वर्ष खूप वाईट गेले आहे. याआधी शेन वॉर्न आणि रॉडनी मार्श यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर आता सायमंडसचाही मृत्यू झाल्याने रसिक व्यथित झाले आहेत.
सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळले आहेत. १९९७ ते २००७ दरम्यान सायमंड्स हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग होता. त्यानंतर सायमंड्स हा फॉक्स क्रिकेटसाठी समालोचक म्हणून काम करत होता. सायमंड्सच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यात त्याच्यासोबत खेळलेल्यांनी अतिशय भावपूर्ण शब्दात सायमंडसला श्रध्दांजली अर्पण केली आहे.