…आणि ऑनलाईन सुनावणीला सरन्यायाधीश देखील कंटाळले !

नवी दिल्ली | कोरोनामुळे सर्वच बाबी ऑनलाईन होत असतांना खटले देखील या प्रकारात चालवले जात आहेत. मात्र अनेकदा यात व्यत्यय येत असल्याने आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे अनेक क्षेत्रांमधील कामकाज हे ऑनलाईन होऊ लागले आहे. सध्या संसर्ग कमी असला तरी बरेच खटले हे ऑनलाईन प्रकारातच चालवले जात आहेत. तथापि, बर्‍याचदा यात अडसर येत असल्याने त्रागा होत असतो. याच प्रकारचा त्रागा आज सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा यांनी आज व्यक्त केला.

आभासी पध्दतीने सुनावणी करण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जात आहे, त्यात नेहेमी काही ना काही समस्या येत असते. अशाच प्रकारचा एक अडथळा शुक्रवारी आल्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकारामुळे न्यायमूर्तींना प्रताडित केले जात असल्याची टिप्पणी यावेळी केली.

सुनावणीवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते. यावर सरन्यायाधीशांनी टेक्निकल टीमचे कान उपटले. काय चालत नाही का? कोण काय म्हणत आहे? इतके सारे आवाज कोठून येत आहेत? हे सगळे संभ्रमित करणारे आहे? आदी प्रश्‍नांची सरबत्ती केली. वास्तविक टेक्निकल टीमने जुनी यंत्रणा हटवून नवी वेबेक्स यंत्रणा न्यायालयात लावली आहे. टेक्निकल टीमच्या चुकीमुुळे शुक्रवारी सरन्यायाधीशांच्या कोर्टात व्हिडिओ त्यांच्या वकिलांचा चालला होता तर आवाज दुसर्या न्यायालयात युक्तीवाद करीत असलेल्या न्यायमूर्तींचा येत होता. या प्रकारांमुळे आम्हाला प्रताडित केले जात असल्याचा आरोप देखील सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी याप्रसंगी केला.

 

Protected Content