जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली ते भुसावळ रेल्वेलाईन दरम्यान अंदाजे ३० ते ३५ वर्षीय एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नशिराबाद पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भादली ते भुसावळ रेल्वे दरम्यानच्या डाऊन रेल्वेलाईन वरील खांबा नंबर ४३५ च्या ५ ते ७ दरम्यान अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात भादली रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी नशिराबाद पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मयताची ओळख पटेल असे कुठलेही माहिती व सामान मिळालेल्या नाही. खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलविण्यात आला आहे. दरम्यान याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.