अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना पाळधी येथे घडली. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, विकास भास्कर पाटील (वय-४२) रा. सनपुले ता. चोपडा ह.मु. शिवदत्त कॉलनी, चंदूअण्णानगर जळगाव हे जळगाव एमआयडीसीतील सिध्दार्थ कार्बोकेममध्ये गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. आज २५ मे रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या कामाच्या निमित्ताने दुचाकीने घराबाहेर पडले होते. दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएल १८९०) ने पाधळी ता. धरणगाव येथे आले. येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते मित्राकडे जाण्यासाठी राष्ट्रीयमहामार्गाला लागले. पाळधी गावातील साईबाबा मंदीराजवळ दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत ते जमीनीवर पडल्याने भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाळधी हे नातेवाईकांचे गाव असल्यामुळे तासाभरात त्यांची ओळख पटली. त्यांचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयत विकास पाटील यांच्या पश्चात पत्नी पुष्पांजली, मुलगा तेजस व मुलगी स्नेहल असा परिवार आहे.  जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस नाईक संदीप पाटील आणि पोकॉ प्रदीप पाटील करीत आहे. 

 

Protected Content